सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांच्या गुरुसेवा परिवाराच्या वतीने जिहयातील प्राथमिक शिक्षकांचे मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख पदोन्नत्या कराव्यात व पगार दरमहा 1 तारखेला खात्यावर जमा करावा या करिता चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज उपोषणाचा पहिला दिवस होता.
या जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत मे अखेर 6 शिक्षण विस्तार अधिकारी, 199 पैकी 178 केंद्रप्रमुख व 15० मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. ही पदे पदोन्नतीने भरण्याविषयीचे यापूर्वी अनेक वेळा निवेदन देऊन उपोषण करण्याचा इशाराही दिला होता. या अनुषंगाने शिक्षणाधिकारी (प्राथ) यांनी दि. 4 /04/2023 पासूनचे नियोजित चक्री उपोषण मागे घेण्याविषयीचे पत्र देऊन दि. 20/4/2023 पर्यंत मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्या पदोन्नत्या पूर्ण करणार असल्याचे सांगितले होते. परंतु आज अखेर ही प्रक्रिया पूर्ण होतांना नाही. एकंदरीत प्रशासनाची पदोन्नत्या करण्याची मानसिकता नसून फक्त चालढकल करीत असल्याचे दिसून येत आहे.
मागील दीड दोन वर्षापासून दर महा 10, 15 किंवा 25 तारखेनंतरच शिक्षकांचा पगार होतो. यामुळे शिक्षकांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमा वेळे?वर फेडता येत नसल्यामुळे त्यांना व्याज व दंड भरावे लागत आहे याशिवाय त्यांचे क्रेडिट स्कोर खराब होत असल्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळवण्यात अडचणी येत आहेत. म्हणून याकडे लक्ष वेधण्याकरिताही गुरूसेवेच्यावतीने उपोषण करण्यात येत आहे.
दरम्यान काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांनी या उपोषणाला भेट दिली. मागण्या समजून घेतल्या, माध्यमांशी बोलताना जिल्हा परिषद शिक्षक हा महत्वाचा घटक आहे, झेडपी प्रशासनाने रोषाला सामोरे जाऊ नये, यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली..
या गुरुसेवा परिवारात सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील गट), सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ (संभाजीराव थोरात गट ), सोलापूर जिल्हा आदर्श शिक्षक समिती, सोलापूर जिल्हा पदवीधर शिक्षक संघटना, सोलापूर जिल्हा प्राथमिक एकल शिक्षक सेवा मंच, सोलापूर जिल्हा उर्दू शिक्षक संघटना, प्रहार शिक्षक संघटना, प्राथ. शिक्षक पती -पत्नी सेवा संघ, जूनी पेन्शन हक्क शिक्षक संघ आदी शिक्षक संघटनांचा समावेश आहेत.
यावेळी शिक्षक नेते अंकुश काळे, म.ज.मोरे, बब्रुवान काशिद, वीरभद्र यादवाड, सुर्यकांत हत्तूरे, राजा राऊत, सुर्यकांत व्हनमाने, रामचंद्र बिराजदार, दत्तात्रय येडवे, इक्बाल नदाफ, विजय वाघमारे, जुल्फीकार मुजावर, महसूद सिद्धिकी, पिरसाब चौधरी, हरिष कडू, अविनाश आगम, विजय लोंढे, पंडीत ढेपे, संजय सावंत, वसंत बंडगर, गोविंद भोसले, श्रीकांत दळवी, नवनाथ धांडोरे व बाबासाहेब दराडे, संभाजी फुले, सिद्राम कटगेरी, शिवाजी पाटील, रावसाहेब जाधवर, संजय चाफाकारंडे, गुलाबराव पाटील, पंडित साबा, आमसिध्द बिराजदार, श्रीकांत बिराजदार, मधुकर राठोड, महादेव कांबळे, विठ्ठलसिंह राजपूत, रामचंद्र कचरे, उमेश घागरे, भीमाशंकर नजरे, मंजुनाथ भतगुणकी, माल्लिनाथ पुजारी, ईरण्णा मैंदर्गी, संजय मंगरुळे, काशिनाथ विजापूरे, दत्तात्रय मारडकर, बालाजी चव्हाण, एकनाथ भालेराव, बा. दा. मुल्ला आदी पदाधिकारी उपस्थित होते.

















