सोलापूर : राज्याच्या पंचायत राज समितीच्या दौऱ्याचा गुरुवारी दुसरा दिवस होता. समितीतील सदस्यांनी तालुके वाटून घेतले होते. त्यामध्ये गट प्रमुख आमदार सुभाष धोटे, आमदार विक्रम काळे, आमदार अंबादास दानवे, आमदार मेघना साकोरे, आमदार महादेव जानकर यांचा समावेश होतो. सोबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे होते.
सकाळच्या सुमारास अक्कलकोट पंचायत समिती त्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांना भेट दिल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास ही समिती दक्षिण पंचायत समिती कार्यालयात दाखल झाली. तत्पूर्वी पंचायत समितीने उत्कृष्ट आणि हटके असे स्वागताचे नियोजन केले होते.
यावेळी सर्वांचे शाल, श्रीफळ, बुके देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व आमदारांना गिफ्ट म्हणून पॅकिंग केलेली एक वस्तू देण्यात आली, त्यावेळी प्रशासनाधिकारी विवेक लिंगराज यांनी साहेब यामध्ये गालीचा असल्याचे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. यावेळी सभागृहात आढावा झाला त्यामध्ये ऑनलाइन प्रेझेन्टेशन करण्यात आले. तालुक्याची वसुली, कामकाज आणि ऑनलाईन कामाची पद्धत पाहता पीआरसी समितीच्या सदस्यांनी दक्षिण पंचायत समितीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. राज्यात कोणत्याही पंचायत समितीचे असे कामकाज पाहिले नसल्याची शाबासकी यावेळी सदस्यांनी दिली.
त्यानंतर या पाचही आमदाराचा ताफा शेजारी असलेल्या उत्तर पंचायत समितीकडे वळाला. प्रवेशद्वारावर गटविकास अधिकारी जस्मिन शेख यांनी सर्वांचे स्वागत केले. उत्तर सोलापूर पंचायत समितीची इमारत छोटी असल्याने सभागृह सुद्धा लहान आहे अशात सर्व अधिकारी आणि हे 5 आमदार तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बसण्याची सोय केली होती.
प्रारंभी संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व आमदारांचा सत्कार करण्यात आला. बसायला जागा कमी असल्याने आमदार महादेव जानकर यांनी मला बसायला जागा आहे का असे बोलून दाखवले. गटविकास अधिकारी जस्मिन शेख यांनी वारंवार कमी जागा आहे, ऍडजेस्ट करा, आता नव्याने पंचायत समितीच्या इमारतीचे बांधकाम होणार असल्याचे सांगितले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धोत्रे यांनाही खूपच दाबून बसावे लागल्याचं चित्र होतं. त्यामुळे उत्तर पंचायत समितीच्या कजेक्टेड जागेमध्ये पीआरसी सदस्य चांगलेच अवघडल्याचं दिसून आलं.

















