सोलापूर : जिल्ह्याचे कलेक्टर…,जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक…, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…., यांच्या पदाचा थाटच वेगळा असतो. हे सर्व जिल्हयाचे सर्वोच्च प्रशासन अधिकारी आहेत. यांच्या हाताखाली सर्व यंत्रणा काम करते.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे तीनही अधिकारी जिल्ह्याचे प्रमुख असले तरी ते आपल्या पदाच्या कधीही अविर्भावात राहत नाहीत. याचेच दर्शन सोमवारी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान वेळी हजारो वारकऱ्यांना घडले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सीईओ दिलीप स्वामी हे तर पांढरा शुभ्र वारकऱ्यांच्या वेशभूषेत होते ते त्या वातावरणाशी समरस झाले. त्याचबरोबर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या जरी पोलीसी ड्रेस मध्ये असल्या तरी त्यांनी वारकऱ्यांचा मानाचा फेटा बांधला होता.
मोठ्या भक्तीमय वातावरणात ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. माऊलींच्या पादुकांचे पूजन जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, सीईओ दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी मनोभावे केले.
पालखीचे पूजन झाले, मानकऱ्यांचा सत्कार झाला, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व सुविधांची माहिती मानकऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर खाली बसून वारकऱ्यांच्या रांगेत या तीनही प्रमुख अधिकाऱ्यांनी भोजन घेतले. यावेळी पदाचा कोणताही अविर्भाव दिसला नाही. जिल्ह्याचे तीन प्रमुख अधिकारी आपल्यासोबत खाली बसून जेवत आहेत हे पाहून वारकरी भारावून गेले.

















