
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महिन्याच्या प्रत्येक शनिवारी ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा उपक्रम घोषित केला होता. त्यानुसार प्रदेश उपाध्यक्षा विद्या लोलगे यांनी सोलापूर शहरातील पंजाब तालीम या ठिकाणी या उपक्रमांतर्गत बैठक घेतली. बैठकीला माजी महापौर महेश कोठे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, शेरू शेख, राजू हुंडेकरी, फयाज हुंडेकरी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंजाब तालीम या मुस्लिम समाज असलेल्या भागात ही बैठक झाली. प्रारंभी विद्या लोलगे यांनी या उपक्रमामागील उद्देश सांगितला, राष्ट्रवादी काँग्रेसने शहराच्या प्रत्येक भागात जाऊन स्थानिक पातळीवरील प्रश्न, राज्य पातळीवरील प्रश्न, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची तयारी याची माहिती जाणून घेण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या माध्यमातून नागरिकांचे जितके प्रश्न सोडवले जातील त्याकडे लक्ष दिले जाणार आहे.
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याना झालेला विरोध याच्या तक्रारी मांडल्या. सोलापूर शहरात काही मनसेचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक मशिदीसमोर येऊन घोषणाबाजी करत आहेत त्याला आवर बसला पाहिजे अशी तक्रार एका मुस्लिम बांधवांनी केली.
महापालिकेच्या वतीने मशिदींना आकारला जाणारा कर वाढवण्यात आला आहे अशी तक्रार पुढे आली. त्याचबरोबर रमजान रोजे सुरू असल्याने महापालिकेने पाणी वेळेवर सोडावे अशी मागणी करण्यात आली. माजी आमदार युनूस भाई शेख यांचे चिरंजीव शेरु शेख यांनी मुस्लिम समाज कायम राष्ट्रवादीसोबत राहिला आहे, समाजाचे छोटे-छोटे स्थानिक प्रश्न आहेत सोडवले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.


















