सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या स्वच्छ व सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत मोहोळ तालुक्यातील पाथरी येथील शाळेची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली. यापूर्वी केवळ स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रमाची माहिती त्यांनी घेतली होती परंतु आज त्यांनी प्रत्यक्षात चित्र पाहिलं आणि समाधान व्यक्त केलं.
केवळ त्यांनी शाळेची पाहणी केली नाही तर शाळेतील विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या, गप्पाच नाही तर त्यांनी थेट गणिताचा क्लास घेतला, 9 चा आणि 12 चा पाढा विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतला तसेच एक विद्यार्थिनी शाळेचा गणवेश न घालता आली होती तेव्हा दादांनी तिला विचारले गणवेश का घातला नाही? तेव्हा त्या विद्यार्थिनीने सांगितले की मी गणवेश घालायला विसरले, अजितदादांनी डोक्यावर हात मारून घेतला म्हणाले शाळेत यायला विसरली नाहीस परंतु गणवेश घालायला विसरलीस असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला…



















