सोलापूर : महाराष्ट्रात कोरोनाची वाढते रुग्ण संख्या धक्कादायक आहेत. त्या सोबत ओमिक्रोन व्हेरियंटचा संसर्ग असल्याने सरकारने मोठ्या प्रमाणात सतर्कता बाळगली आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली.
या एकूणच पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात निर्बंध वाढवले आहेत. गर्दी होणाऱ्या ठिकाणांना निर्बंध घातले असून त्यामध्ये प्रामुख्याने लग्न कार्यालयासाठी केवळ 50 जणांची उपस्थिती निश्चित करण्यात आले आहे तसेच अंत्यविधीसाठी तर केवळ 20 लोकांनाच परवानगी दिली गेली आहे. सरकारचे हे आदेश 1 जानेवारी नवीन वर्षापासून लागू करण्यात आले आहेत.
सोलापूर ग्रामीण भागात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हे आदेश जारी केले त्याचबरोबर सोलापूर महापालिका हद्दीमध्ये आयुक्त पी शिवशंकर यांनी शनिवारी आदेश काढले महापालिका आयुक्तांच्या आदेशाला दुसऱ्याच दिवशी सोलापुरात अनेकांनी केराची टोपली दाखवली. शहरामध्ये सर्वात मोठे कार्यालय असलेल्या अचिव्हर्स मल्टीपर्पज हॉल मध्ये सध्या शेकडो लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा सुरू आहे, रस्त्यावर दुतर्फा वाहने लावल्याने ट्राफिक मोठ्याप्रमाणात जाम झाले आहे. असे असतानाही पोलिस प्रशासन असेल किंवा महापालिका प्रशासन यांच्या नजरेत ‘अचिव्हर्स’ का पडत नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होतो.
‘अचिव्हर्स’ला नक्की अभय कुणाचे असा प्रश्न तर मागील काही दिवसांमध्ये महापालिका आणि पोलिस प्रशासनाने पेट्रोलपंपांवर केलेल्या कारवाईवरून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे ग्रामीण पोलिसांच्या पेट्रोल पंपासमोर हॉल आहे असे असताना कुणाच्या नजरेत का पडत नाही हा संशोधनाचा विषय आहे.


















