विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारा दरम्यान एक वाक्य चांगलेच प्रसिद्ध झाले होते, ते म्हणजे मेरे अंगने में तुम्हारा क्या काम हैं. आमदार प्रणिती शिंदे यांनी दिलीप माने, महेश कोठे यांना लक्ष केले होते, स्वतःचे मतदार संघ सोडून माझ्या मतदारसंघात काय काम असा त्याचा अर्थ होता,
नंतर सिद्धेश्वर यात्रेचा विषय आला, ती कशा पद्धतीने करायची यावर शासन दरबारी गोंधळ झाला, निर्णय घेता येईना, तेव्हा आमदार संजयमामा शिंदे यांनी शहराच्या यात्रेसाठी आमदार विजय देशमुख यांच्या सोबत प्रयत्न केले, त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सुध्दा शासन स्तरावर खूप प्रयत्न केले, देवस्थान पंच कमिटी शिष्टमंडळ मुंबईला नेले. तेव्हा दोन शिंदे आमदारात चांगलाच श्रेयवाद रंगला होता, त्यावेळी ही मेरे अंगने में तुम्हारा क्या काम हैं हे वाक्य चर्चेला आले,
सध्या कोरोना संसर्ग कमी न झाल्याने सोलापूर शहरात 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय झालाय, पुन्हा 15 दिवस वाढल्याने व्यापारी वर्ग आक्रमक झाला आहे, निवेदने झाली, आंदोलने झाली, व्यापाऱ्यांना अटक पण झाली, पण निर्बन्ध शिथील करण्याचा निर्णय होत नाही, सोलापूर शहराचा विषय असल्याने आमदार प्रणिती शिंदे यांनी मुंबईत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भेट घेतली, परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार ताईंनी केली आहे, दुसरीकडे आमदार संजयमामा शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून लॉक डाऊन शिथील करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, आता शहरात पुन्हा या दोन शिंदे आमदारांच्या श्रेयवादाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे, पुन्हा मेरे अंगने में तुम्हारा क्या काम हैं या वाक्याची चर्चा होत आहे. मामा करमाळ्याचे आमदार असताना त्यांचं शहरात काय काम असा प्रश्न निश्चितच काँग्रेसचे शहराचे कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.
यात कोण बाजी करतय याकडे लक्ष असून यात दिलीप माने मालकांनी उडी घेतलीय, ते व्यापाऱ्यांचे नेतृत्व करत आहेत, ते शिवसेनेचे नेते आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचे हे कोडे पडले आहे, सध्या त्यांना शिवसेनेचे नेते म्हणूनच ओळखले जाते, मग माने मालकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडून हा विषय मिटवावा पण ते थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावतात, यावरून त्यांच्या राजकारणाचा कुणाला अंदाज येत नाही. निर्णय झाल्यास मात्र माझ्यामुळे झाला म्हणून कुणी श्रेय घेऊ नये, प्रयत्न सर्वांचेच आहेत.

















