सोलापूर : राज्यामध्ये तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेस इतर पक्षातील कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र होतं. मात्र राज्यात सत्तांतर झाले शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले आता शिंदे गटाकडे जाणाऱ्यांचा ओढा वाढला आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा समावेश दिसून येतो. सोलापुरात महेश कोठे समर्थक नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला असून दिवाळीनंतर ते आपला राजकीय ‘बार’ उडवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दिलीप कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांची उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ चौगुले यांच्या कार्यालयात रात्रीच्या सुमारास भेट घेऊन चर्चा केली होती. सर्वप्रथम ‘सिंहासन’ने याबाबत बातमी प्रसिद्ध केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, महिला अध्यक्ष सुनीता रोटे, माजी शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या कारभारावर कायमच दिलीप कोल्हे हे टीका करत होते. त्यांची पदे बदलण्यासाठी ते कायमच आक्रमक दिसून आले. दरम्यानच्या काळात महेश कोठे यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केल्यानंतर दिलीप कोल्हे हे कोठे यांच्यासोबत दिसले मात्र कोठेही राष्ट्रवादीत इंटरेस्ट दाखवत नसल्याने कोल्हे यांच्या भूमिकेबाबत ही तर्कवितर्क काढले जात होते. मधल्या काळात कोल्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे गटाशी संपर्क वाढवला आहे, त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत पुन्हा त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन आपला प्रवेश पक्का केला आहे. दिवाळीनंतर ते प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहर निरीक्षक शेखर माने यांनी दिलीप कोल्हे यांना फोन करून थांबवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली, तेव्हा कोल्हे यांनी उलट मी का जातोय याचे तुम्ही व शहराध्यक्ष जाधव हे आत्मचिंतन करा, मग माझ्याशी बोला असा उलट सवाल त्यांनी केल्याचे समजले. पवारनिष्ठ कोल्हे राष्ट्रवादी सोडत असल्याने हा पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.




















