सोलापूर : लोकशासन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे व कार्याध्यक्ष मारुती जाधव यांनी जिल्हाधिकारी, नवे अप्पर जिल्हाधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांना पत्र देऊन तक्रार केली आहे. पुनर्वसनचे सुरू असलेले सर्व आदेश, सर्व कब्जा व चलनांचे रजिस्टर सील करून तूर्तास 100 फायलींवर स्थगिती द्यावी अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
दिंडोरे यांनी या पत्रात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षात जी कामे झाली नाहीत ती कामे गेल्या दोन महिन्यात वेगाने सुरू आहेत. या प्रकरणांमध्ये दलालांचा संबंध असल्याचा आरोप दिंडोरे यांनी केला आहे.
पुनर्वसन व अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, मागील दोन महिन्यापासून या कार्यालयात सुट्टीच्या दिवसात सुद्धा दलाल फिरत असल्याचे दिसून आले आहे. मूळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना बाजूला सारून एजंटाच्या सहाय्याने फाईल मंजूर केल्या जातात, पुनर्वसन कार्यालयातील मंडलाधिकारी सुखदेव पाटील यांच्या कारभारावरून लोकशासन पार्टीने संशय व्यक्त केला आहे.



















