सोलापूर : पर्यटन मंत्रालयद्वारे तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक सुविधा संवर्धन राष्ट्रीय मिशनच्या माध्यमातून अध्यात्मिक विरासत संवर्धन म्हणजेच प्रसाद योजनेअंतर्गत सोलापुरातील मंदिरांचा समावेश करावा. सोलापूर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्रसिद्ध पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर, सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर, हत्तरसंगकुडलचे हरिहरेश्वर मंदिर व तुळजापुरचे तुळजाभवानी मंदिरांच्या विकासासाठी व तीर्थयात्रेकरुंच्या सुविधेसाठी या प्रसाद योजनेअंतर्गत समावेश करण्याची मागणी खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शून्य प्रहार काळात करीत, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसेच पर्यटन मंत्री यांना याबाबतची मागणी खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली. पर्यटन मंत्रालयद्वारे तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक सुविधा संवर्धन राष्ट्रीय मिशनची सुरुवात ऑक्टोबर 2017 मध्ये करण्यात आली. या योजनेस तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक विरासत संवर्धन म्हणजे प्रसाद योजना असे नामकरण केले. त्याअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील लाखो लोकांचे तिर्थ स्थळ असलेले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर, हत्तरसंगकुडलचे हरिहरेश्वर मंदिर व तुळजापुरचे तुळजाभवानी हे पुरातन मंदिरे आहेत. हत्तरसंगकुडलचे हरिहरेश्वर मंदिर हे पुरातन असून तेथील मंदिरात एकाच शिवलिंगावर ३६५ शिवलिंगाचा समावेश आहे. असे शिवलिंग विश्वात एकच असून तेथील शिलालेख हा मराठी भाषेतील पहिला शिलालेख आहे. त्यामुळे या मंदिराच्या संवर्धनासाठी या मंदिरांचा समावेश प्रसाद योजनेत करणे आवश्यक असल्याचे खा. डॉ. जयसिद्धेश्वर म्हणाले.
हि योजना राज्य व केंद्रशासित प्रदेश सरकारने ओळखलेल्या एजन्सीद्वारे कार्यान्वित केली जाते. महत्त्वाच्या राष्ट्रीय/जागतिक तीर्थक्षेत्रे आणि वारसा स्थळांचे पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक वृद्धी. समुदाय आधारित विकासाचे अनुसरण करणे आणि स्थानिक समुदायांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. वारसा शहराचा एकात्मिक पर्यटन विकास, स्थानिक कला, संस्कृती, हस्तकला, पाककृती इ.पायाभूत सुविधांची कमतरता दूर करण्यासाठी पर्यटन विकासाची समन्वय यंत्रणा मजबूत करण्यासाठी प्रसाद योजनेद्वारे कार्य केले जाते. या अंतर्गत, पर्यटन मंत्रालयाने ओळखलेल्या स्थळांवर पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारांना केंद्रीय आर्थिक सहाय्य (CFA) प्रदान केले जाते. या योजनेंतर्गत, सार्वजनिक वित्तपुरवठ्याच्या घटकांसाठी 100% निधी केंद्र सरकारद्वारे प्रदान केला जातो.
सोलापूर जिल्हा हा अध्यात्मिक तीर्थस्थळांचा जिल्हा म्ह्णून प्रसिद्ध आहे परंतु अद्याप सोलापुरातील एकही प्राचीन मंदिराचा समावेश या योजनेत नाही. त्यामुळे मंदिरच्या संवर्धन व पर्यटन विकासासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सोलापूरसह आसपास परिसरातील प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी प्रसाद योजनेत समावेश करण्याची मागणी खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली.


















