सोलापूर : सोलापूर लोकसभा भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांचा आणि सागर सिमेंटचे महाराष्ट्र हेड आणि एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगणुरे यांच्यात गुरु शिष्याचे नाते आहे. महादेव कोगनुरे एम के फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यात अग्रेसर आहेत. त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचं जाळ सोलापूर शहर विशेष करून दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विखुरले आहे.
कोगनुरे हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जाते. त्याच दृष्टीने सामाजिक कार्यातून राजकारणाकडे त्यांची वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे. ते थेट कोणत्या पक्षाच्या संपर्कात नसले तरी त्यांचा डोळा काँग्रेस किंवा भाजप या दोन पक्षाच्या उमेदवारीवर आहे असे बोलले जाते. खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या संपर्कात असल्याने त्यांचा ओढा भाजपकडेही दिसून येतो.
निराधारांना डबा पुरवणे, मुलींना शिक्षणात मदत व्हावी म्हणून सायकल पुरवणे, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे, आपत्ती आल्यानंतर गरजूंच्या मदतीला धावून जाणे असे कार्य त्यांचे एमके फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे.
मंगळवारी सागर सिमेंट आणि एम के फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने एक लाख वही वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची होती. समोर किमान पाच ते सहा हजार नागरिक उपस्थित होते.
एकूणच महादेव कोगनुरे यांचे कार्य आणि ही जमलेली गर्दी पाहून खासदार डॉक्टर स्वामी यांनी आपल्या भाषणात “माझा चेला गुरुवर मात करणारा निघेल असे मला वाटते” असे सांगून नव्या राजकीय चर्चेला तोंड फोडले आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये नव्यांना संधी देण्याची चर्चा होत आहे जर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून कोगनुरे यांना संधी मिळाली तर निश्चितच नवल वाटायला नको.



















