सोलापूर : मागील महिनाभरापासून सोलापुरातील तसेच जिल्ह्यातील सर्व सेतू सुविधा केंद्र मक्ता संपल्याने बंद करण्यात आले आहेत. सर्व प्रकारचे दाखले हे महा-ई-सेवा केंद्रातून दिले जात आहेत परंतु हे दाखले देताना मोठ्या प्रमाणात वेळ जात असल्याने नागरिकांमध्ये ओरड सुरू आहे.
सर्व सेतू बंद झाल्याने त्या सेतू मधील कर्मचारी तसेच हातावर पोट असलेले, बाहेर अर्ज भरून देणारे एजंट, बॉण्ड रायटर यांची मात्र चांगलीच उपासमार होताना दिसत आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी राज्याच्या प्रमुखांशी बोलून सेतू केंद्र सुरू करण्याबाबत भूमिका व्यक्त केली आहे.
याच पार्श्वभूमीवर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सेतू बाहेरील एजंट आतील कर्मचारी यांचे एक दिवसाचे धरणे आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले.
यावेळी गायकवाड म्हणाले, प्रशासनाने जाणीवपूर्वक महा-ई-सेवा केंद्र चालकांशी हात मिळवणी करून सेतू सुविधा केंद्र बंद केले आहेत ते लवकरात लवकर सुरू न केल्यास शहरातील महा-ई- सेवा केंद्र बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला.
















