सोलापूर : सुरेश पाटील सोलापूरच्या भाजप मधील ज्येष्ठ नेतृत्व. महापालिकेतील अभ्यासू नेता. विष प्रयोग होऊनही जनतेच्या विकास कामांसाठी धडपड असणारा नेता. त्यांच्या डोक्यात कधी काय येईल त्याचा नेम नसतो. सर्व पक्ष महापालिका निवडणुकीकडे नजरा लावून बसले असले तरी निवडणूक होणे अद्याप तरी शक्य वाटत नाही.
याच पार्श्वभूमीवर सुरेश ‘अण्णा’ समविचारी नेत्यांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत. भाजपचे सुरेश पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, वंचित नेते आनंद चंदनशिवे हे एकत्र पहायला मिळताहेत. भविष्यात पक्षीय चित्र कसे का असेना सध्या तरी झालेली ही एकी समविचारी आघाडीची नांदी आहे.
महापालिका अतिरिक्त आयुक्त म्हणून सोलापूरचे सुपुत्र संदीप कारंजे यांची नियुक्ती झाली. तसेच काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष पदी चेतन नरोटे यांची निवड झाली. त्या प्रित्यर्थ सुरेश पाटील यांनी संदीप कारंजे, चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे किसन जाधव यांच्यासह बाबा मिस्त्री यांना सोबत घेऊन सद्गुरू बसवारुढ स्वामी ट्रस्टचे ईश्वरानंद अप्पाजी व मठाधिपती शिवपुत्र अप्पाजी यांची भेट घडवून आशीर्वाद घेतला. या सत्कार कार्यक्रमाची सध्या राजकीय वर्तुळात आहे. सोलापूरच्या राजकारणातील समविचारी नेते एकत्र येत आहेत. हे कुणा विरुद्ध असणार हे मात्र अजून समोर आलेले नाही.
सध्या सोलापूरच्या राजकारणात आमदार विजयकुमार देशमुख व सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध पेटले आहे. हे दोन्ही नेते आता एकमेकांना आव्हान देत आहेत. काडादी यांनी थेट देशमुख यांना आगामी काळात आपली उमेदवारी वाचवावी असे आव्हान दिल्याने लिंगायत समाजात चर्चेला उधाण आले आहे. आता तर काडादी हे भाजपचे उमेदवार असणार का? असे तर्कवितर्क काढले जात आहेत. हाच विषय धरून सुरेश पाटील हे मोठं वक्तव्य करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. सुरेश अण्णा आणि विजय मालकात वर-वर पटत असल्याचे दिसत असले तरी या दोघांमध्ये राजकारणाच्या खेळी कशा चालतात हे जगजाहीर आहे.

















