सोलापूर : जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचा-यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची पदे निरसित करु नका, अनुकंपातत्वावर वारसांना विनाअट नियुक्त दया, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या या मागण्या दिर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे राज्यातील 18 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. शुक्रवारी आंदोलनाचा चौथा दिवस होता.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने शुक्रवारी सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वीरपक्ष घेरडे, सिव्हिल हॉस्पिटल चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंकर जाधव व वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे या तिघांनी प्रारंभी मंडन करून या आंदोलनाला सुरुवात केली.
दरम्यान कर्मचारी समन्वय समितीचे नेते शंतनू जाधव म्हणाले, आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही परंतु सरकार कोणताही निर्णय घेत नाही. केवळ दोन ओळीचे पत्र आम्ही मागतोय येत्या सहा महिन्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घ्या अन्यथा हे आंदोलन असे चालू राहील असे सांगत त्यांनी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.

















