सोलापूर : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवार 13 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता नियोजन भवन या ठिकाणी बोलावण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकास कामांचा निधी देण्यात येईल.
पालकमंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्या बैठकीनंतर सोलापूर जिल्ह्यातील विकास कामांची यादी फायनल करण्याचे अधिकार अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना देण्यात आले होते. दरम्यानच्या काळात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने विकास कामे होऊ शकले नाहीत पण आता निवडणुकीची आचारसंहिता संपली असून कामांना गती येण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या जलजीवन मिशन या योजनेत सर्वाधिक निधी असल्याने जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी या योजनेच्या कामांवर आपला फोकस ठेवलाय, सुट्टीच्या दिवसात ही त्यांनी या योजनेच्या कामांचा आढावा घेत कामाला गती दिल्याचे दिसून येते.
यापूर्वी झालेल्या ‘डीपीसी’ बैठकीत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांची चौकशी लावण्यात आली होती मात्र त्याचा अहवाल ही अजून समोर आलेला नाही. त्यामुळे मधल्या काळात झालेल्या कामांचा आढावा या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. एकूणच ‘जलजीवन’ यावेळीही आमदारांचे टार्गेट राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
















