सोलापूर : येथील सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उद्घाटन सोहळा गुरुवार दि. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी, सकाळी १०.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राष्ट्रीय स्तरावरील अर्बन बँक फेडरेशनचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर , सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. प्रणिती शिंदे, आ. राजेंद्र राऊत, आ. सचिन कल्याणशेट्टी, माजी आ. दिलीप सोपल, माजी आ. सिद्धाराम म्हेत्रे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही संस्थेचा ५० वर्षांचा प्रवास त्या संस्थेसाठी अतिशय महत्वाचा असतो. ग्राहक आणि सभासदांचा भक्कम विश्वास, प्रगतीशील व्यवस्थापन आणि सर्व प्रकारच्या व्यवसायिक स्पर्धेमध्ये यशस्वीपणे टिकून राहून दीर्घकाळ सतत काम करीत राहणे, ही खरंतर अतिशय आव्हानात्मक गोष्ट आहे. मात्र सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या ५० वर्षांच्या प्रगतीच्या इतिहासातील नेमके हेच महत्वाचे घटक असून तेच खरे बलस्थान आहे. यावर आमचा दृढ विश्वास आहे,असे शिवदारे यांनी सांगितले.
आजच्या घडीला बँकेच्या एकूण ठेवी ४६० कोटी रुपये तर एकूण कर्ज वितरण ३१० कोटी रुपये मिळून मिश्र व्यवसाय ७७० कोटीचा आहे. बँकेच्या सोलापूर शहर आणि जिल्हा तसेच पुणे, लातूर, उदगीर शहरात मिळून एकूण १६ शाखा आहेत. UPI आणि मोबाईल बँकिंग ह्या सेवा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची परवानगी मिळविण्याची प्रक्रिया चालू असून सुवर्ण महोत्सवी वर्षांत याची पूर्तता होईल.
बँकेचा सुवर्ण महोत्सवा निमित्ताने विविध सांस्कृतिक, कार्यक्रम, सहकार / अर्थ बैंकिंग विषयातील तज्ञ व्यक्तीची व्याख्याने, तसेच विविध क्षेत्रात उदा: अध्यात्म, इतिहास, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राज्यशास्त्र कार्यरत असणान्या धुरिणांची व्याख्याने, शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थीवर्गासाठी आणि महिलावर्गासाठी विविध उपक्रम यांचे आयोजन वर्षभर करण्यात येणार आहे.