सोलापूरमध्ये शासकीय रुग्णालयांची कमतरता भासत असल्यामुळे सन 2009 साली पहिल्यांदा निवडून आल्यानंतर शासकीय रुग्णालयांचा विस्तार करून क्षमता वाढविणे व नवीन रुग्णालये मंजूर करून आणण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे या प्रयत्नशिल होत्या. तत्कालीन राज्य शासनाचे सार्वजनिक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्याकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य संस्था स्थापनेच्या बृहत आराखड्यामध्ये सोलापूरकरीता 100 खाटांचे सिव्हिल हॉस्पिटल व 100 खाटांचे महिला आणि शिशु रुग्णालय मंजूर करून घेतले.
सन 2014 ते सन 2019 या कालावधीमध्ये सदर रुग्णालयांच्या फाईल तत्कालीन भाजपाच्या सरकारने प्रलंबित ठेवल्या व सन 2019 च्या निवडणुकीपूर्वी सोलापूरात काहीतरी विकास काम केले हे दाखविण्यासाठी या रुग्णालयांचे भुमिपूजन केले.
सोलापूरकरीता 100 खाटांचे सिव्हिल हॉस्पिटल व 100 खाटांचे महिला आणि शिशु रुग्णालय या दोन्ही रुग्णालयांच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान मंगळवारी आमदार प्रणिती शिंदे यांनी माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, माजी गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, युवक प्रदेश सरचिटणीस सुमित भोसले, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे सोबत या रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली. रुग्णालयांकरीता लागणाऱ्या स्टाफच्या पद निर्मीतीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल आहे. त्याला लवकरच मंजूर मिळवून घेत आहोत. यानंतर सदरचे रुग्णालयांमध्ये 200 बेड सर्वसामान्यांच्या सोयीकरीता उपलब्ध होणार आहे.

















