सोलापूर- मुस्लिम धर्मियांचे आदर्श, जगाला मानवतेचा संदेश देणारे पैगंबर मुहम्मद यांच्याविषयी द्वेषमूलक व बदनामीकारक पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या मनोहर वैद्य (manohar vaidya) या समाजकंटकास राष्ट्रीय सुरक्षा कायद्या (National Security Act) अंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी धार्मिक व्देष विरोधी अमन कमिटी सोलापूरच्या वतीने शहर काजी मुफ्ती अमजदअली (City Qazi Mufti Amjad Ali ) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त हरिष बैजल (Harish Baijal) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी जमियत उलमा-ए-हिंद चे मौलाना ईब्राहिम कासमी (Maulana Ibrahim Kasmi), जमियत अहले हदिसचे मौलाना ताहेर बेग (Maulana Taher Beg), काँग्रेसचे नगरसेवक रियाज हुंडेकरी,एमआयएमचे नगरसेवक अजहर हुंडेकरी, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे युसुफ मेजर,मौलाना आझाद विचार मंचचे हसीब नदाफ, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान,नासिर आळंदकर आदी उपस्थित होते.
सदर समाजकंटकांचा हेतू देशातील हिंदू-मुस्लीम समाजामध्ये तेढ निर्माण करून जातीय द्वेष पसरवण्याचा आहे. अशा कृत्यामुळे धार्मिक द्वेष निर्माण होऊन देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण होणार आहे. यासाठी सदर आरोपीस राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाई करून योग्य शासन व्हावे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य जबाब कोर्टाला सादर करावा अशी विनंती शिष्टमंडळाने आयुक्तांना केली. सदर आरोपीस अटक करून कायदेशीर कारवाई केली आहे. धार्मिक द्वेष पसरविणारे कुठलेही कृत्य सहन केले जाणार नाही असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळास दिले.
या कृत्याने सोलापुरातील व देशभरातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे समाजामध्ये तीव्र प्रक्षोभ निर्माण झाला आहे. आयुक्तांनी कृतिशील कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले असल्याने सोलापुरातील सर्व हिंदू- मुस्लिम बांधवांनी शांतता व सुव्यवस्था राखावी व आपला सामाजिक सलोखा वृद्धिवंत करावा असे आवाहन अमन समितीचे निमंत्रक मुफ्ती अमजदअली काजी यांनी केले आहे.
————————————-


















