अक्कलकोट : जिन्होने पुरे राज्य की गंदगी एक दिन मे निकाल दी.. उन्हे पाणी से क्या दूध से अभिषेक करना चाहिए..! हा डायलॉग हिंदी ‘नायक’ चित्रपटातील अनिल कपूरच्या बाबतीत शेतकऱ्यांनी उद्गारला होता.तोच अनुभव सोमवारच्या आठवडा बाजाराच्या दिवशी अक्कलकोट येथे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या बाबतीत अनुभवास मिळाला.
अक्कलकोट तालुक्याच्या सर्व मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा निधी मिळावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केलेल्या सिद्धाराम म्हेत्रे यांच्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास ३० कोटींचा निधी मिळाला. शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाने संपन्न झाली आणि याचा आनंद व्यक्त करण्यासाठी चपळगाव व कुरनूर येथील शेतकऱ्यांनी म्हेत्रे यांचा चक्क दुधाने अभिषेक केला.
चपळगाव येथील सिध्दाराम भंडारकवठे, धानप्पा डोळ्ळे,खंडप्पा वाले, सोमनाथ बाणेगांव,ब्रम्हानंद म्हमाणे,अविनाश इंगुले,बसवराज हन्नुरे,विजय कांबळे या शेतकऱ्यांकडुन तर कुरनुरमधील सरपंच व्यंकट मोरे,अयुब तांबोळी,सुरेश बिराजदार,दयानंद मोरे,अजय शिंदे,केशव मोरे,अप्पा शिंदे,संभाजी बेडगे, किशोर सुरवसे,स्वामीराव सुरवसे,लक्ष्मण शिंगटे,नारायण मोरे आदी शेतकऱ्यांनी हा दुग्धाभिषेक केला.
विरोधकांनी विटेवर वीट नाही ठेवली-व्यंकट मोरे(सरपंच,कुरनुर)
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा दुधाने अभिषेक करण्यामागचा उद्देश व्यक्त करत असताना कुरनूर गावचे सरपंच व्यंकट मोरे यांनी विरोधी पक्षावर घनाघात केला.यावेळी व्यंकट मोरे म्हणाले की सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपल्या कार्यकाळात तालुक्याचा संपूर्ण विकास करण्यासाठी अनेक त्याग केले आहेत.कुरनूर धरण,एकरूख उपसा सिंचन योजना,मातोश्री-गोकूळ कारखान्याची निर्मिती यासह तालुक्याच्या संपूर्ण विकासासाठी मैत्री यांनी प्रयत्न केले असून विरोधकांनी मात्र विटेवर वीट ठेवली नाही असा आरोप केला.
नायक चित्रपटाची आठवण झाली; आयुष्याचे सार्थक झाले-सिध्दाराम म्हेत्रे
आज वरचा राजकारणात अनेक सत्कार स्वीकारले परंतु आजचा सत्कार लाख मोलाचा ठरला. जगाच्या पोशिंद्याकडून मिळालेला हा सन्मान हा फार मोठा आशीर्वाद आहे.शेतकऱ्यांनी केलेला दुग्धाभिषेक पाहून नायक चित्रपटातील अनिल कपूरची आठवण झाली.या पुढील काळात शेतकऱ्यांसाठी आवश्यक ते प्रयत्न निश्चितपणे करणार असल्याचे म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.



















