सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत सोलापुरात मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्यावर नाही तर तोंडी हनुमान चालीसा पठण केले. पोलिसांनी यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी लावलेले भोंगे व अम्प्लिफायर जप्त केले. तरीही लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी तोंडी हनुमान चालीसा म्हणून आपल्या राज साहेबांच्या हाकेला साद दिली. दरम्यान फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस दिली आहे त्या नोटीस मध्ये पहा काय लिहिले आहे…..
मी उदयसिंह पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर आपणास याव्दारे सुचीत करतो की, सध्या धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले भोंगे/स्पिकर संदर्भात आपल्या पक्षाचे वतीने विरोध करण्यात येत आहे. श्री राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी औरंगाबाद येथील आपल्या सभेत विशिष्ठ धार्मिक स्थळावरील स्पिकर न काढल्यास त्या धार्मिक स्थळांसमोर हनुमानचालीसा लावा असे वक्तव्य केलेले आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे धर्मामध्ये/जातीमध्ये/ गटामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.
आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख पदाधिकारी आहात. धार्मिक स्थळांवरील भोंगे/स्पिकर संदर्भात धर्मामध्ये/जातीमध्ये /गटामध्ये निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करु नये व अशा प्रकारच्या कृत्यांना चालना देऊ नये.
सदर बाबत आपणाकडून किंवा आपले कार्यकत्यांकडून कोणत्याही प्रकारच्या कृत्यामुळे, वक्त्यव्यामुळे वर्तनामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास व धर्मामध्ये / जातीमध्ये / गटामध्ये तेढ निर्माण झाल्यास आपणास व्यक्तीश: जबाबदार धरुन आपणाविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच सदरची नोटीस मा. कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.



















