सोलापूर – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंतीचा समारोप रविवारी भव्य मिरवणुकीने होणार असून प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या (पी.बी. ग्रुपच्या) वतीने यंदाच्या मिरवणुकीत नुकतेच तेलंगणा राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ फूट पुतळ्याचे उद्घाटन झाले. त्या पुतळ्याची प्रतिकृती व बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराची प्रतिकृती हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण असल्याची माहिती प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांनी दिले.
नुकतेच १४ एप्रिल रोजी तेलंगणा राज्य सरकारने हैदराबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ फूट उंचीचा अतिभव्य पुतळा उभारून देशात सर्वात भव्य स्मारक उभे केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या पुतळ्याची माहिती मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना व्हावी या उद्देशाने २० फूट उंचीचा पुतळा प्रतिकृती द्वारे मिरवणुकीत भीम अनुयायांना पहावयास मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्यासमोरच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांचे पुतळे सुद्धा असणार आहेत. तसेच त्यागमूर्ती माता रमाई यांची १५ × २५ फुटाची भव्य प्रतिमा डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यामागे असणार आहे व त्यास विविध छटांच्या रंगीत लाईटचा इफेक्ट व विविध फुलांच्या माळा यामुळे हा प्रसंग नेत्रदीपक असा दिसणार आहे.
त्याचप्रमाणे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्मचक्र प्रवर्तन करून या देशात धम्मक्रांती केली. बौद्ध धम्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांना बुद्धगया येथे बुद्धत्व प्राप्त होऊन ते सम्यक संबुद्ध झाले व ‘बुद्ध’ म्हणून सर्वत्र ओळखून जाऊ लागले. जगातील बौद्धांचे पवित्र स्थळ म्हणून महाबोधी महाविहार प्रसिद्ध आहे. या स्थळाला जागतिक वारसा स्थान म्हणून मान्यता मिळालेली आहे. अशा पवित्रस्थान असलेल्या महाबोधी महाविहाराचे १४ × २४ फूट उंचीची प्रतिकृती व सात फूट भगवान बुद्धाची मूर्ती व अन्य सजावट हे यंदाच्या मिरवणुकीतील विशेष आकर्षण आहे.
मागील पंधरा दिवसापासून या देखाव्याच्या तयारी करिता आनंद चंदनशिवे यांच्या संकल्पनेनुसार व मार्गदर्शनाखाली आर.के. डेकोरेटर्स, पुणे यांच्यामार्फत करण पवार व त्यांचे ७ ते ८ सहकारी तसेच मोझेस डेकोरेटर्स अँड इव्हेंट मॅनेजमेंटचे कारागीर मागील ७ ते ८ दिवसापासून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या (पी.बी ग्रुपच्या) वतीने केलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती एल.ई.डी. द्वारे जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मंडळाच्या वतीने महिनाभरापासून याबाबतचे नियोजन करण्यात येत असून एक आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्धाचा प्रतिकात्मक देखावा सादर होणार आहे. आनंद चंदनशिवे यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या मिरवणुकीतील या देखाव्याच्या कामात पी.बी. ग्रुपचे प्रमुख गौतम चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष अमित बनसोडे, कार्याध्यक्ष आदित्य चंदनशिवे व सचिव महेश शिंदे हे परिश्रम घेत आहेत.



















