सोलापूर : केंद्र सरकारचे नवभारत साक्षरता अभियान हे सोलापूर जिल्ह्यात एक रोल मॉडेल बनेल असा विश्वास योजना पुणे शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. क्षीरसागर हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते, त्यांनी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन हे अभियान राबविण्यात चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा तृप्ती अंधारे यांच्या दालनात पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, सध्या सोलापूर जिल्ह्यात या अभियानाबाबत सकारात्मक प्रतिसाद आहे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प केला आहे, तसेच योजना शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांचे कामकाज पाहता हे अभियान सोलापूर जिल्ह्यात एक रोल मॉडेल बनेल असा विश्वास व्यक्त केला.
सध्या जिल्हा परिषदेमध्ये वटारे यांना कार्यालय नसतानाही त्या कामकाज पाहत आहेत, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे हा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता ते म्हणाले, निरंतर शिक्षण अधिकारी यांनाच योजना शिक्षणाधिकारी केले आहे. त्यांचे कार्यालये आहेत, त्या कार्यालयाचा पर्याय आहे. आता जिल्हाधिकारी कार्यालय स्थलांतर झाले आहे, तिथे ही योजना शिक्षणाधिकारी कार्यालय होऊ शकते असे क्षीरसागर म्हणाले.
केंद्र शासनाने २०२२ ते २०२७ या काळासाठी नवभारत साक्षरता योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. नवभारत साक्षरता योजनेसाठी साक्षरतेकडून समृध्दीकडे हे ब्रीदवाक्य घेतले गेले. १५ वर्षे आणि त्याहून अधिक म्हणजे ३५ वर्षापर्यंतच्या निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता म्हणजे वाचन,लेखन, संख्याज्ञान, महत्त्वपूर्ण जीवन कौशल्य विकसित करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.