सोलापूर : एटीएम मधून पैसे काढण्यास मदत करतो म्हणून पद्धतशीर एटीएम कार्डची आदलाबदल करत एसबीआय बँकेतील तब्बल 3 लाख 92 हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आली आहे.
दिगंबर मल्हारी जाधव, वय ४९ वर्षे, व्यवसाय शेती, रा. मु.पो इंदिरा नगर, बक्षिहिप्परगा ता. दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीचा मुलगा नामे अजित हा जुना बोरामणी नाका स्टेट बँक ऑफ इंडिया, मार्केट यार्ड शाखेचे एटीएम सेंटर मधून पैसे काढत असताना त्याला पैसे काढायचे समजले नाही. त्याचे पाठीमागे उभा असलेला अनोळखी इसम वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे, अंगाने मध्यम असे वर्णनाचा इसमाने पैसे काढणेकामी मदत करुन त्याचे समक्ष मुलास एटीएम कार्डचा पासवर्ड टाकणेस सांगुन फिर्यादीचे मुलास २०,००० रु काढुन दिले.
सदर वेळी फिर्यादीचे मुलाची उद्देशपूर्वक दिशाभुल करुन एटीएम कार्डची आदला बदल करुन त्याचेकडील एसबीआय एटीएम कार्ड देवून फिर्यादीचे एटीएम कार्ड नेवून फसवणुक करून दि. ०५/०८/२०२२ रोजी पासुन ते दि. २५/०८/२०२२ रोजी पर्यंत फिर्यादीचे संमतीविना, लबाडीने फिर्यादीच्या अकाऊंटवरुन फिर्यादीचे एटीएम कार्डव्दारे एकुण – ३,९२,१०४.८८ रु काढुन त्यातील काही रक्कम विविध ठिकाणी वापरुन फिर्यादीची फसवणुक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक ताकभाते हे करीत आहेत.


















