सोलापूर : मिनी ट्रक मधून कांदा घेऊन सोलापूर मार्केट यार्ड कडे निघालेल्या टेम्पोच्या धडकेने सोलापूर मंगळवेढा रोडवरील देगाव गावाजवळ अपघात होऊन दुचाकी चालक जागीच ठार झाला ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.
अमोल नारायण फडतरे वय 35 राहणार जामगाव तालुका मोहोळ असे मरण पावलेल्याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या सर्वत्र कांद्याचे सीजन चालू आहे. क्रमांक एम एच 13 डी क्यू 5245 हा कांद्याचा मिनी ट्रक सोलापूर मार्केट यार्डकडे कांदा घेऊन निघाला होता. जेव्हा देगाव जवळील समृद्धी गार्डन या ठिकाणी आला असता दुचाकिला जोराची धडक दिली.
अपघात इतका जोरात होता की, दुचाकी टेम्पोखाली येऊन लांबपर्यंत फरफटत गेली. टेम्पो दुभाजकाला धडकून पलटी झाल्याचे दिसून आले. या अपघातात दुचाकीचालक अमोल फडतरे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली आणि मृतदेहाला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे शवविच्छेदन साठी पाठवून दिले. नातेवाईकांना अपघाताची माहिती मिळताच सिव्हील हॉस्पिटल मध्ये एकच गर्दी झाली असून या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.


















