सोलापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा झाल्यामुळे त्यांचे खासदार पद केंद्रातील सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीने रद्द केले. या कारवाईमुळे देशातील काँग्रेस आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह आंदोलन करण्यात येऊन लक्ष वेधण्यात आले. आमदार शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या तोंडाला काळेपट्टी बांधून निषेध व्यक्त केला.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या,काँग्रेस पक्ष देशात सत्याग्रह आंदोलन घेत आहे. नेते प्रचारात सध्या काहीही बोलतात, तेवढ्याने खासदारकी रद्द केली, आठ वर्षे निवडणूक लढविता येणार नाही आता तर घर ही खाली करण्यास सांगितले, भाजपचे धोरण म्हणजे हा लोकशाहीचा खून आहे, तुम्ही काहीही करा उलट देशात राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढत चालली आहे, जितके भाजप विरोधकांना त्रास देतील तितके काँग्रेस उभारी घेईल.

















