सोलापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आहेत.
सोलापुरातील शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ “राहुल गांधी आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है” असे नवे पोस्टर लॉन्च केले. हे पोस्टर काँग्रेस भावना समोर लावण्यात आले असून प्रत्येक वार्डामध्ये पोस्टर झळकणार आहे तसेच शहरातील शंभर रिक्षांवर पोस्टर दिसणार आहे.
यावेळी राहुल यांच्या समर्थनार्थ तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
शहराध्यक्ष नरोटे म्हणाले, भाजपने सूडबुद्धीने कारवाई करत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. भाजप पक्ष देशात व राज्यात सत्तेत असताना सुद्धा त्यांना रस्त्यावर उतरावे लागले, यावरून काँग्रेस देशात मजबूत होत असून राहुल गांधी यांची देशात लोकप्रियता वाढत चालल्याचे दिसत आहे. सोलापुरातील जनतेला भाजपचे हे सुडाचे राजकारण आणि कटकारस्थान माहीत व्हावे यासाठी “राहुल गांधी आप संघर्ष करो” हे पोस्टर प्रसिद्ध केले आहे.
यावेळी विनोद भोसले, आरिफ शेख, हेमा चिंचोळकर, गणेश डोंगरे, तौफिक हत्तुरे, सुनील रसाळे, अंबादास करगुळे, श्रीशैल रणधिरे, शकील मौलवी, दत्तू बंदपट्टे, किसन मेकाले, तिरुपती परकीपंडला, शरद गुमटे, सुभाष वाघमारे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















