सोलापूर : शेळगी मध्ये कारहूनवी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, सालाबादाप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांचा राजा “बैलजोड्यांची” विधिवत पूजा करण्यात आली. तत्पूर्वी सर्व बैलजोड्याना सजवून सवाद्य शेळगी गावातून मिरवणूक काढण्यात आली.
ही मिरवणूक शेळगी गावठाण परिसरमार्गे श्री मल्लिकार्जुन मंदिर, श्री जगदंबा मंदिरमार्गे शेळगी गावच्या वेशीवर आल्यानंतर मानकऱ्यांकडून मानाचा “कर” तोडण्यात आला. मिरवणूक मार्गावर मानाच्या बैलजोड्यांची जागोजागी गावातील माता-भगिनींकडून आरती करण्यात आली.
हा कारहुणवी सणाचा मान पिढ्यानपिढ्या चालत आलेला परंपरागत गावचे माजी पोलीस पाटील जगदीश पाटील यांच्या परिवाराकडे आहे. हा सण शेळगी सर्व शेतकरी बांधव व शेळगी ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करतात व मानाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात.
या मानाच्या मिरवणुकीमध्ये महादेव रेवणसिद्ध पाटील, सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ शैलेश पाटील, माजी नगरसेवक अविनाश पाटील, राजशेखर पाटील, ॲड केदार जगदीश पाटील, अनिल पाटील, नागनाथ बाळशेट्टी कल्याणी बोरगावकर, गंगाधर यलशेट्टी, सिद्धाराम धाप्पाधुळे, अनिल यलशेट्टी, सूर्यकांत रमणशेट्टी, रामचंद्र चौगुले, अशोक काशीद, चंद्रकांत पाटील, दिलीप पाटील यांच्यासह शेळगी व परिसरातील सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

















