सोलापूर – यंत्रमाग कामगारांना माथाडी धर्तीवर कल्याणकारी मंडळाची स्थापना करून कामगारांना लाभ मिळवून दिले पाहिजे. त्या अनुषंगाने कामगारांचे सामाजिक व आर्थिक स्थैर्य उंचावेल. याकरीता गेल्या चार दशकांपासून सीटू च्या माध्यमातून अविरत लढा चालू आहे. मात्र शासन, प्रशासन आणि कारखानदार यांच्या वेळकाढू आणि उदासीन धोरणांमुळे कामगार न्यायापासून वंचित आहेत.
रक्त सांडून मिळवलेल्या कामगार कायद्यांची वर्षानुवर्षे अमलबजावणी होत नाही.म्हणून 50 टक्के हंगामी पगारवाढ,15 टक्के बोनस, भविषयनिर्वाह निधी अन्य मागण्या घेऊन यंत्रमाग कामगारांचे 4 नोव्हेंबर पासून यंत्रमाग धारक संघ कार्यालय एम.आय. डी.सी.येथे आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी लढाऊ यंत्रमाग कामगारांच्या मेळाव्यात केली.
बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दत्त नगर येथे लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियन च्या वतीने कॉ लक्ष्मण माळी बुवा जॉबर यांच्या अध्यक्षतेखाली लढाऊ यंत्रमाग कामगारांचा मेळावा पार पडला.
या आहेत प्रमुख मागण्या.
१) यंत्रमाग कामगारांना दिवाळी बोनस १५% जाहीर करा.
२) मा. जावळे समितीने जाहीर केल्याप्रमाणे पिसरेटवर आधारीत सुधारीत किमान वेतनाची अंमलबाजवणी करा.
३) कल्याणकारी मंडळ स्थापन करा.
४)विज मंडळाचे खाजगीकरण हाणून पाडा.
रे नगर मधील कामगारांच्या घरांना रु. ५०० मध्ये विज कनेक्शन द्या.
५) प्रा. फंड, ग्रॅज्युएटी, इ.एस.आय. इत्यादी कामगार कायदे लागू करा.
यावेळी कॉ.व्यंकटेश कोंगारी व सिटू चे राज्य महासचिव ॲड.एम.एच.शेख यांनी मार्गदर्शन केले.