सोलापूर : महाराष्ट्रातून राहुल गांधी यांच्या अतिशय जवळ असलेला कार्यकर्ता म्हणून आता काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची ओळख निर्माण झाली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय वारसदार म्हणून आमदार ताई सध्या काम पाहत आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभेच्या नेते पदापर्यंत मजल मारली त्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणिती शिंदे या आपली राजकीय वाटचाल करीत आहेत.
देशात महागाई, भ्रष्टाचार, गॅस दरवाढ, राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई त्यामुळे भाजपच्या विरोधात आपोआप वातावरण तयार होऊ लागले आहे. महाराष्ट्रामध्ये पाडापाडीचे राजकारण भाजपने केल्याने जनता महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकांवरून दिसून आले.
सोलापूर लोकसभेला काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना दोन वेळा पराभवाला सामोरे जावे लागले परंतु आमदार प्रणिती शिंदे या आता मैदानात उतरल्याने वातावरण बदलत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यंदा सोलापूर लोकसभा ताब्यात घेण्याची नामी संधी काँग्रेसला असल्याचे चित्र दिसून येते. सुशीलकुमार शिंदे यांचे जिल्ह्यात दौरे वाढले आहेत त्याच पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी शहर मध्यतून बाहेर पडून आता जिल्ह्यात दौरे वाढविण्याची गरज आहे.
पक्ष अडचणीत असताना पक्षाला अनेक नेते सोडून गेले त्यामध्ये माजी खासदार धर्मांण्णा साधूल, माजी महापौर महेश कोठे, माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर यु एन बेरीया, माजी नगरसेवक तौफिक शेख, माजी महापौर नलिनी चंदेले यांचा समावेश आहे. पण ते कितपत त्या पक्षात राहतील हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.
जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या कामकाजावरही ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते. कुठले आंदोलन नाही, निवेदन नाही, कधी तर दोन महिन्याला जिल्हाध्यक्ष येतात बैठक घेतात आणि निघून जातात असे काहीसे चित्र आहे. माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी मजबूत होत चालल्याने तिकडचा विचार सोडता सोलापूर लोकसभा ताब्यात घेण्यासाठी याच भागातला जिल्हाध्यक्ष नेमणे तितकेच गरजेचे आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास शहर मध्य हा तर काँग्रेसचा बालेकिल्ला. त्या ठिकाणी आमदार प्रणिती शिंदे यांना कोणत्याही पक्षाचे आव्हान दिसून येत नाही. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर सध्या भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मजबूत अवस्थेत दिसून येतात मात्र कल्याणशेट्टी विरोधकांनी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना सहकार्य केले तर त्या ठिकाणी निश्चितच पुन्हा काँग्रेसचा आमदार पाहायला मिळेल.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मात्र काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे सध्या तो भाजपच्या ताब्यात आहे. 2019 च्या विधानसभेचे चित्र पाहिले तर ग्रामीण भागातून भाजपला स्पष्ट नाकारले आहे त्यामुळे आमदार सुभाष देशमुख हे आता नदीपट्ट्याच्या शेतकऱ्यांसोबत आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत.
माजी आमदार दिलीप माने यांची उत्तर आणि दक्षिण मध्ये पकड चांगली आहे परंतु त्यांच्या पक्ष आणि भूमिका स्पष्ट नसल्याने कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळते. म्हणून दक्षिण तालुक्यात काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे, तळागाळात जाऊन कामे करण्यास ते प्राधान्य देत असल्याने आणि दक्षिण तालुक्यात काँग्रेसला अजूनही जनाधार असल्याने निश्चितच हसापुरे यांच्या रूपात काँग्रेसला आमदार भेटू शकतो. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राजकीय चाणक्य म्हणून हसापूरे यांची ओळख आहे त्यांना सोबत घेऊन आमदार प्रणिती शिंदे यांनी रणनीती आखली तर निश्चितच जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समिती व इतर सहकारी संस्था यामध्ये प्रणिती शिंदे यांचा दबदबा राहील.
शहर उत्तरच्या बाबतीत हा मतदारसंघ जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याकडे मागू शकतो त्या बदल्यात मंगळवेढा-पंढरपूर हा मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा असे बोलले जात आहे. मंगळवेढ्याचे आमदार समाधान अवताडे हे मंगळवेढ्यात फॉर्मात आहेत मात्र पंढरपूर मध्ये परिचारक-अवताडे गटातील असलेल्या गटबाजीचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला होऊ शकतो. मंगळवेढ्याच्या बाजार समितीच्या निवडणुकीनंतर अवताडे यांची ताकद समोर येईल.
मोहोळ मतदारसंघ हा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटबाजीतून जात आहे. राष्ट्रवादीमध्ये माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यातील गटबाजीचा फायदा भाजप घेत आहे. भाजपचे विजय डोंगरे गट सोडला तर भाजप कुमकुवत आहे त्या ठिकाणीही पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना विचाराचा आमदार निश्चित होईल.