सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्याचे नेते सुरेश हसापुरे यांनी नुकताच आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने म्हणजेच तालुक्यातील तब्बल 55 विकास कार्यकारी सोसायटीच्या नूतन संचालकांचा सत्कार व आपल्याला पडत्या काळात सहकार्य केलेल्या 11 ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला. या विराट कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे हे दोन नेते येऊ शकले नाहीत. मात्र माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आमदार संजयमामा शिंदे, विजयराज डोंगरे यांनी कार्यक्रमाची शान वाढवली.
याच दिवशी म्हणजे 29 मे रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी संजवाड व आहेरवाडी या तीन विकास सोसायट्यांची निवडणूक होती त्याही तिन्ही सोसायट्यांवर सुरेश हसापुरे यांच्या गटाची एक हाती सत्ता आली हे तिन्ही विजय म्हणजे हसापुरे यांना वाढदिवसाचे गिफ्ट ठरले. 31 मे रोजी शासकीय विश्रामगृहात या तीनही सोसायटीच्या नूतन संचालकांचा हसापुरे यांनी सत्कार केला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील विकास कार्यकारी सोसायट्यांवर जिल्हा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे यांची एक हाती सत्ता आल्याने कॉंग्रेसला आणखी मजबुती मिळाल्याचे चित्र आहे.