सोलापूर : काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत 4 जून रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल या गावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विविध विकास कार्यक्रमांचे भूमिपूजन आयोजित करण्यात आले होते. काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम झाला.
यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्या समोर कारकल ग्रामस्थांनी विजेचा प्रश्न उपस्थित केला. सोलापूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या भीमा नदीवरील औज बंधाऱ्याच्या बॅक वॉटर मध्ये कारकल या गावाचा समावेश असल्याने उन्हाळ्यात तब्बल 3 महिने वीज बंद केली जाते. या काळात किमान 8 तास वीज पुरवठा व्हावा अशी मागणी कारकलचे सिद्धप्पा हंजगी यांनी सुरेश हसापुरे यांच्या नेतृत्वाखाली केली होती.
याची तातडीने दखल घेण्यात आली, आमदार प्रणिती शिंदे यांची महाराष्ट्र विज वितरण मंडळाचे अधीक्षक अभियंता सांगळे यांच्यासोबत जनवात्सल्य निवासस्थानी बैठक झाली या बैठकीला स्वतः सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना फोन लावून कारकल हे गाव बॅक वॉटर मधून वगळून उन्हाळ्यामध्ये त्या गावाला किमान 12 तास वीज पुरवठा करण्याचे आदेश द्यावेत अशा सूचना केल्या.
त्याची दखल ऊर्जामंत्री राऊत यांनी घेतली असून सुरेश हसापुरे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल या गावाचा अतिशय महत्त्वाचा विषय सुटण्यास मदत झाली आहे.