सोलापूर : काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश हसापुरे यांच्या वाढदिवसाची तयारी जोरदार सुरू आहे. यंदाचा वाढदिवस जंगी करण्याचे नियोजन कार्यकर्त्यांनी केले आहे, त्याला कारण सुद्धा तसेच आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तब्बल 58 सोसायट्यावर हसापुरे गटाने वर्चस्व राखले आहे. त्या सर्व संचालकांचा सत्कार हसापुरे हे महिला संचालकांना साडी चोळी तर पुरुषांना टॉवेल टोपी देऊन करणार आहेत. 29 मे रोजी सुरेश हसापुरे यांचा वाढदिवस असून त्या दिवशी हा कार्यक्रम होत आहे, टाकळीकर मंगल कार्यालयात 1 हजार जणांच्या सत्काराचे नियोजन आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह जिल्ह्यातील काही आमदार व इतर नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याच दिवशी सुरेश हसापुरे यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अपक्ष असतानाही मतदान केलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील 11 ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार करून हसापुरे हे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणार आहेत.
या वाढदिवसानिमित्त लोकनेते सुरेश हसापुरे वाढदिवस गौरव समितीची स्थापना करण्यात आली असून दक्षिण तालुका अध्यक्ष हरीश पाटील हे गौरव समितीचे अध्यक्ष तर पद्मसिंह शिवशेट्टी पाटील हे स्वागताध्यक्ष आहेत.


















