सोलापूर : मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते या योजनेंतर्गत दक्षिण तालुक्यातील 80 किलोमीटरचे रस्ते तयार होणार असून यासाठी तब्बल 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी या मंजूर रस्त्यांच्या कामासंदर्भात जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आढावा बैठक घेतली.
याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, तहसीलदार अमोल कुंभार, राजशेखर लिंबारे, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, माजी उपसभापती रामपा चीवडशेट्टी, कार्यकारी अभियंता खराडे, सहाय्यक गटविकास अधिकारी शितल बुलबुले, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम महाजन, उपअभियंता जिल्हा परिषद रविशंकर बोधले आदी उपस्थित होते.
प्रारंभी सरचिटणीस यतीन शहा यांनी दक्षिण तालुक्यात 48 पाणंद रस्ते मंजूर केल्या बद्दल सुभाष देशमुखांच्या अभिनंदन ठराव मांडला.
यावेळी उपस्थितांमधून तक्रारी पुढे येत असल्याने आमदार देशमुख यांनी चांगलेच फटकारले. ते म्हणाले, गावाची आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर पाणंद रस्ते झालेच पाहिजे, अडचणी सांगू नका समन्वय साधून पर्याय सुचवा आणि रस्ते करून घ्या, पाणंद रस्ते करायचे का नाही? रस्ते तर गरजेचे आहेत, त्यामुळे पिकाला फायदा होणार असून पीक वेळेवर बाजारात जाईल, आडमुठे धोरण ठेऊ नका, सरपंच, ग्रामसेवक, तंटामुक्त अध्यक्ष यांनी बसून तोडगा काढला पाहिजे, गावापर्यंतचे वस्ती व शेत रस्ते करायचे आहेत, रडू नका, लढायची तयारी ठेवू, मी तुमच्या दारापर्यंत, तोंडा पर्यंत घास आणून ठेवतोय खायाचे का नाही हे तुम्ही ठरवा, पैशाची कमतरता नाही, रस्ते करून घ्या.


















