सोलापूर : जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी सोमवारी जिल्हा परिषदेचे सन 2023 24 चे 45 कोटीचे अंदाजपत्रक सादर केले. समाज कल्याण, महिला बालकल्याण, शिक्षण विभाग, कृषी, बांधकाम विभागाला भरीव तरतूद त्यांनी केली आहे. यासह काही नाविन्यपूर्ण योजना त्यांनी सुरू केल्या आहेत.
बजेट वाचून झाल्यावर ते काहीसे भावुक झाले. मी नवखा असताना मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार मिळाला, सोलापूर सारख्या पांडुरंगाच्या पावनभूमीत मला बजेट मांडण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो.
संदीप कोहिणकर तसे ‘लकी’ म्हणावे लागेल. त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये पदभार घेऊन केवळ दीड महिन्यात त्यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार मिळाला तो तब्बल दीड महिण्याकरिता. या दीड महिन्यात अनेक अधिकारी प्रभारी आहेत, अशांना घेऊन मिनी मंत्रालयाचा कारभार त्यांना करायचा होता. तसेच बजेट तयार करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. त्यांनी अतिशय दिलखुलासपणे आपले कामकाज केले आहे. कुणीही सीईओ यांच्या चेंबरमधून बाहेर आला तर समाधानाने येतो.
बजेटवर सूचना करताना जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पंडीत भोसले यांनी जलसंधारण विभागाला आजपर्यंत सर्वाधिक निधी दिल्याबद्दल कोहिनकर यांचे अभिनंदन केले. काही गटविकास अधिकाऱ्यांनी आता शिलाई मशीन अशा योजना बंद करून शेती करणाऱ्या महिलांना ताडपत्री योजना सुरू करण्याची सूचना केली. कवी स्वभावाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी आपल्या शायरी स्टाईलने बांधकामला जादा निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.


















