सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी ग्रामीण विकासाची गंगोत्री असणा-या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडील तसेच तालुक्यातील विकास कामांची पाहणी व तपासणी करण्याच्या त्यांच्या अजेंड्यानुसार मंगळवेढा येथील कामांची पाहणी व तपासणी केली. आपण फक्त कार्यालयीन कामकाजच करीत नसून क्षेत्रीय कामात पण लक्ष घालून विकास कामांचा दर्जा तपासणार आहोत व या पध्दतीने जिल्हा परिषद सोलापूरची उत्कृष्ट कामांची धुरा समर्थपणे दुर्गेच्या स्वरुपात सांभाळू याची ग्वाही दिली होती.
बुधवार १८ ऑक्टोबर २०२३ रोजी आमदार समाधान आवताडे यांच्या मंगळवेढा तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील त्यांनीच सुचीत केलेले जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील लेखाशिर्ष ३०५४ २०८१ ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण करणे या योजनेतील भाळवणी ते जित्ती रस्ता या रस्त्याची समक्ष पाहणी करुन आवश्यकतेनुसार कामांची मोजमापे देखील घेवून कामाची तपासणी केली. यावेळी सदर रस्ताचे एकुण ५१०.०० मीटर चे काम सध्या पूर्णत्वाकडे आलेले असून या कामातील बाजूपट्ट्यांचे काम फक्त बाकी आहे. कामाचा बाव, कामाचा दर्जा याही बाबी त्यांनी स्वतः पडताळून पाहिल्या कामातील तांत्रीक बाबींबाबत प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणीच्या वेळी उपस्थित कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांचेशी चर्चा करून शंकांचे निरसन करुन घेतलेले आहे. या नंतर या कामाबाबत त्यांनी एकंदरीतच समाधान व्यक्त केले.
या रस्त्याच्या कामासोबतच ग्रामीण भागातील लहान मुलांना व मातांना आधार केंद्र असे श्री संत चोखामेळा नगर ता मंगळवेढा येथील आंगणवाडीच्या इमारतीचे काम व आंगणवाडीचे कामकाज पाहून इमारतीच्या रंगसंगती बाबत काही मौलिक सूचना दिल्या तसेच आंगणवाडी करीता आवश्यक व लहान मुलांना आकर्षण किया आंगणवाडीची ओढ लागण्याच्या दृष्टीने गरजेच्या असणा-या बाबी अन्य योजनेतून निधी उपलब्ध करुन कामे पूर्ण करुन घेणेबाबत तसेच पोषण आहाराच्या बाबतही नाविन्यपूर्ण सुचना दिलेल्या आहेत.
आंगणवाडीच्या मुलांच्या उपस्थितीबाबतही आंगणवाडी सेविका व अन्य कर्मचारी यांचेशी संवाद साधून पट संख्या वाढविणेच्या बाबत सुचना दिलेल्या आहेत. यांनतर त्यांनी मंगळवेढा शहरालगतच्या श्री संत दामाजीनगर ग्रामपंचायतीने नागरी सुविधा योजने मधून पूर्ण झालेले बगीच्याचे काम व आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत पूर्ण झालेले सभामंडपाच्या कामाची पाहणी केली व एकुणच मंगळवेढा उपविभागाकडील व पंचायत समिती कडील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.