सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग इथल्या श्री स्वामी समर्थ सहकारी सूतमीलच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या मंगळवारी शेवटचा दिवस होता.
या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापूरे यांनी आपलं पॅनल उभा करून सुत मिलचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. दरम्यान या निवडणुकीत हसापुरे गटाच्या 9 उमेदवारांचे अर्ज सूचक अनुमोदक नसल्याने बाद झाले आहेत. त्यामुळे हसापुरे यांच्या गटाचे पाच उमेदवार निवडणुकीत होते.
तत्पूर्वी सकाळी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या लक्ष्मी या निवासस्थानी सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, मल्लिकार्जुन पाटील, हरीश पाटील, शिवानंद पाटील या नेत्यांची बैठक झाली. निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सिद्धाराम म्हेत्रे यांनी समन्वय साधला. या सुत मिलमध्ये 600 कर्मचारी आहेत, त्यांचा विचार करून निवडणूक बिनविरोध करावी अशा सूचना म्हेत्रे यांनी हसापुरे यांना केल्या. म्हेत्रे आणि हसापुरे मध्यस्थीने सगळेच फार्म काढण्याचे ठरले. हसापुरे गटाला एकुण पाच जागा देण्यात आल्या त्यात डोगंरराजे(सलगर), हंजगी(वळंसग), उणणद (तोळनुर) आणि दोन स्वीकृत संचालक असे ठरल्यामुळे सगळे फार्म काढण्यात आले.
निवडणूक अधिकारी कार्यालयात काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, मल्लिकार्जुन पाटील, नागनाथ जावळे, प्रभाकर दिंडोरे, शिवसिद्ध बुळळा, सतीश इसापुरे, बसवराज माशाळे हे ठाण मांडून बसले होते.
शेवटी सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पुढाकाराने ही निवडणूक बिनविरोध झाल्याने टेन्शन मध्ये असलेल्या चेअरमन राजशेखर शिवदारे यांच्या चेहऱयावर आनंद पहायला मिळाला.
दरम्यान बिनविरोध झालेल्या संचालकाची नावे वाचून दाखवत हसापुरे गटाला दोन स्वीकृत संचालक पद देण्याचा शब्द देत ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, ज्येष्ठ नेते धर्मराज काडादी, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, मल्लिकार्जुन पाटील यांचे सहकार्य मिळाल्याचे चेअरमन राजशेखर शिवदारे यांनी सांगितले…


















