सोलापूर : शासनाने खाजगी शाळांना अनुदानाचा टप्पा वाढविला आहे. यामध्ये 20 वरून 40 वरून 60 असे अनुदान झाले आहे. या अनुदानाचा टप्पा आपल्या शाळेला मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल केलेल्या शिक्षकांनी मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्हा परिषदेच्या आवारात गर्दी केली आहे.
हे अनुदान मिळण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने संस्थेच्या कामकाजातील त्रुटी काढल्या असल्याने शिक्षक वैतागले आहेत. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागात सध्या सावळा गोंधळ सुरू असल्याचे बोलले जात आहे. शिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. त्यामुळे तर टप्पा अनुदानाच्या कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याचे चित्र असून कामात दिरंगाई होत आहे.
या एकूणच गोंधळाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर हे काही प्रशासकीय कामानिमित्त दुपारच्या सुमारास जिल्हा परिषदेमध्ये आले होते. बाबर हे आल्याचे दिसताच शिक्षकांनी त्यांना घेराव घातला. “साहेब तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये पाहिजे होते” गेल्यावर्षी कोणताही गोंधळ न होता, कोणत्याही त्रुटी न काढता काम झाले आताच असा का त्रास दिला जातोय? असे अनेक प्रश्न शिक्षकांनी बाबर यांच्यासमोर केले. तेव्हा त्यांनी सर्व शिक्षकांना समजावले “तुम्ही सर्व आपली माणसे आहात, होईल व्यवस्थित काळजी करू नका”.
एकूणच माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभाराकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी या विषयात लक्ष घालून कामातील दिरंगाई थांबवावी अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.



















