सोलापूर : जिल्हा परिषदेच्या तपासणीसाठी आलेल्या पंचायत राज समितीचे विभागून जिल्ह्यात दौरे होते. त्यामध्ये सदाभाऊ खोत यांच्यासोबत काही आमदार हे सांगोला तालुक्यात होते. त्याठिकाणी एका व्यक्तीने सदाभाऊंना अडवले आणि 2014 साली लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांना जेवण दिले तेव्हाचे माझ्या हॉटेलचे जुने बिल द्या म्हणून त्या व्यक्तीने सदाभाऊ खोत यांना चांगलेच हैराण केले.
हा विषय संपूर्ण जिल्ह्यात आणि जिल्हा परिषदेमध्ये चर्चेचा ठरला आहे. कसेबसे सदाभाऊंनी त्या व्यक्तीपासून आपली सुटका करून घेतली. तिकडे असे झाले असताना दुसरीकडे मात्र विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांनी स्वतःच्या खिशातून महिला चालवत असलेल्या बचतगटाच्या हॉटेलचे बिल दिले.
पंचायत राज समितीची एक टीम अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या तालुक्यात भेटी देणार होती. अक्कलकोट तालुक्यातील पंचायत समितीला भेट दिल्यानंतर गटप्रमुख आमदार सुभाष धोटे, आमदार विक्रम काळे, आमदार अंबादास दानवे, आमदार मेघना साकोरे, आमदार महादेव जानकर त्यांची टीम अक्कलकोट तालुक्यातील चप्पळगाव या ठिकाणी गेली.
त्याठिकाणी भाग्यलक्ष्मी महिला समूह बचत गटाच्या मार्फत हॉटेल चालवण्यात येते त्या हाॅटेलमध्ये सर्व सदस्यांनी जाऊन गरमा गरम बटाटेवड्यांवर ताव मारला तसेच त्या ठिकाणी असलेला गोड खावा सुद्धा आवडीने खाल्ला. नंतर महिला बचतगटाचे बीलापोटी आमदार विक्रम काळे यांनी रोख पाचशे रूपये देऊन मदतीचा हात दिला. आमदार मेघना बोर्डीकर – साकोरे यांनी सर्व महिला सदस्यांची आस्थेने विचारपूस करत आरोग्याची काळजी घेणेसाठी मार्गदर्शन करीन संवाद साधला.

















