सांगोला : रस्त्याची कामे करणार्या पंढरपूर येथील ठेकेदाराने शेतकरी महिलेच्या संमतीविना एक एकर क्षेत्रात उत्खनन करून मुरूम चोरी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मात्र, मुरूम चोरीची तक्रार दाखल करून घेण्यास पोलीस ठाण्यात टाळाटाळ करण्यात आली होती. संबंधित शेतकरी महिलेने याबाबत कोर्टात धाव घेतली. अखेर मुरूम चोरी प्रकरणी पंढरपूर येथील सी.पी.बागल अँड कंपनीच्या चंद्रकांत प्रभाकर बागल व पद्माकर प्रभाकर बागल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा हुकूम न्यायालयाने सांगोला पोलीस निरीक्षक यांना दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी सरिता दादासो सावंत रा.कडलास रोड, सांगोला यांची हंगिरगे ता. सांगोला येथे शेतजमीन आहे. फिर्यादीच्या जमीनीपासून जवळच हंगीरंगे ते टोकलेवस्ती या रस्त्याचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत मुरुमीकरण व खडीकरण करण्यात आले आहे. सदर रस्त्याचा ठेका सी.पी. बागल अँड कंपनी रा. गादेगाव ता. पंढरपूर यांना मिळाला होता. या रस्त्याच्या कामासाठी सी.पी.बागल अँड कंपनीच्या चंद्रकांत प्रभाकर बागल व पद्माकर प्रभाकर बागल यांनी फिर्यादी सरिता दादासो सावंत यांची संमती न घेता त्यांच्या एक एकर क्षेत्रातील सुमारे ते साडेतीन फूट खोदकाम करून जागोजागी खड्डे पाडून मुरूम रस्त्याच्या कामासाठी वापरला. त्यानंतर सावंत यांनी हंगिरगे ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी केली असता त्यांच्या जमीनीतील मुरूम सी.पी.बागल अँड कंपनीने हंगीरगे ते टोकलेवस्ती रस्त्याच्या कामासाठी वापरला असल्याची माहीती मिळाली.
सरिता सावंत या सांगोला पोलीस स्टेशनमध्ये मुरूम चोरीची तक्रार देण्यास गेल्या असता पोलीसांनी त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर सावंत यांनी सांगोला पोलीस स्टेशनला रजिस्टर पोष्टाने लेखी तकार पाठविली व त्या तक्रारीची प्रत रजिस्टर पोष्टाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा उपविभागीय अधिकारी यांना पाठविल्या. त्यानंतर जवळा मंडल अधिकारी यांच्या अहवालानुसार चौकशी करून सांगोला तहसीलदार यांनी सी.पी.बागल कंपनीला नोटीस पाठविली होती. मात्र, राजकीय पुढार्यांच्या दबावामुळे पोलिसांनी संबंधित ठेकेदारांवर कारवाई केली नाही. त्यामुळे सरिता सावंत यांनी अखेर कोर्टात धाव घेतली होती. चंद्रकांत बागल व पद्माकर बागल यांनी फिर्यादीच्या मालकीच्या मिळकतीतील मुरूम चोरून नेला आहे. सदर मुरूम खोदकामासाठी शासनाची कोणतीही परवनगी घेतली नाही. तसेच बेकायदा मुरूम उत्खनन करून पर्यावरणाचे नुकसान केले आहे.
मुरुमाची चोरी करण्यासाठी त्यांच्या कंपनीच्या वाहनांचा वापर केला आहे. चोरून नेलेला मुरूम इतर कोणत्या ठिकाणी वापरला आहे किंवा कसे? तसेच मुरूम चोरून नेलेल्या जागेचा सविस्तर पंचनामा होणे आवश्यक असल्याने मुरूम चोरीच्या गुन्ह्याचा तपास होवून आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी न्यायालयाने पोलीस निरीक्षक सांगोला यांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर मुरूम चोरीप्रकरणी पंढरपूर येथील सी.पी.बागल अँड कंपनीच्या चंद्रकांत प्रभाकर बागल व पद्माकर प्रभाकर बागल यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करीत आहेत.
















