सोलापूर : दिनांक 31 ऑक्टोबर रोजी 25000 रूपयांची लाच घेताना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ किरण लोहार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लोहार यांच्यावर कारवाई सुरू आहे. दरम्यान शिक्षण उपसंचालक यांच्याकडून प्राथमिक अहवाल तातडीने पाठविण्यात यावा असे कळविण्यात आले होते, त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक अहवाल शिक्षण उपसंचालक यांच्याकडे दिनांक 1 नोव्हेंबर रोजी पाठविला होता.
दिनांक 3 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाला. या अहवालानुसार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी तातडीने अवर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शिक्षण संचालक पुणे व शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना किरण लोहार शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांचे विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चा भंग केल्याने त्यांचेवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) मधिल नियम ४ नुसार कारवाई करण्यात यावी असा अहवाल पाठविण्यात आला आहे.
शिक्षणाधिकारी हे वर्ग एकचे अधिकारी असून त्यांचे नियुक्ती प्राधिकारी राज्य शासन आहे. वर्ग एकच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी या नात्याने राज्य शासनास आहेत. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील अहवाल प्राप्त होताच तातडीने पुढील कारवाईसाठी अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनास पाठविला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 48 तासाच्या आत आपला अहवाल राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्याकडे पाठवला आहे जिल्हा परिषदेतील नियंत्रण अधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे असल्याने त्यांचाही अहवाल शिक्षण आयुक्ताकडे जाणे क्रमप्राप्त असल्याने या दोन्ही अहवालानंतर लोहार यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.




















