सोलापूर : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे नुकतेच सांगोला दौऱ्यावर आले होते. तेव्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांची भेट घेतली जिल्ह्यात राबवलेल्या विविध अभियानांची माहिती दिली. हे सर्वअभियान पाहून त्यांनी झेडपीचे कौतुक केले. त्या वेळेस लवकरच सर्व सीईओ ची कॉन्फरन्स बोलाऊन त्यांचे समोर तुमचे अभियान सादर करू असे आश्वासन दिले होते.
समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणी करिता क्षेत्रीय अधिकारी यांची घेण्यात येणाऱ्या दोन दिवसीय राज्यस्तरीय निवासी कार्यशाळा दिनांक २८.०४.२०२३ व दि. २९.०४.२०२३ या कालावधीत आयोजित केली आहे. सदर कार्यशाळेचे स्थळ “ॲम्बी व्हॅली सीटी” लोणावळा येथे असून या कार्यशाळेस शालेय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांच्यासह शिक्षण विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत.
मागील दोन वर्षात कोविड २०१९ मुळे राज्यातील मुलांच्या शिक्षणाची हानी झाल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता यावर शिक्षण क्षेत्रात कार्यरत सर्व घटकांनी एकत्र चर्चा करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नपूर्वक कार्यवाही करण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत असल्याचे सुरज मांढरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने हे वर्ष “गुणवत्तावृद्धी वर्ष “म्हणून घोषित केलेले आहे. तसेच केंद्र शासनाने सुद्धा ” निपुण भारत अभियान ” प्रभावीपणे राबविणेबाबत वारंवार सूचित केले आहे.
नुकतेच शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना पंढरपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांनी राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण केले होते. यानंतर सांगोला येथील ग्रामीण साहित्य संमेलनाला संबोधित करताना ही कार्यशाळा आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे सीईओ स्वामी यांनी राबविलेल्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करून या कार्यशाळेत सादरीकरणासाठी सीईओ स्वामींना निमंत्रित केले जाणार असल्याचे सांगितले होते.


















