भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी रस्त्यात ट्रॅक्टर्स अडवून, मुरूम वाहतूक करीत असल्याचा आरोप करुन, गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवत, त्या ट्रॅक्टर्स मालकांकडून ६ हजार रुपये उकळले होते. त्यांच्या या प्रतापाला घाबरून शेतकरी आणि ट्रॅक्टर्स मालकांनी विहिरीचा उपसा उचलण्याचे काम बंद केल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर तालुका पोलीस ठाणेअंतर्गत कासेगांव पोलीस दूरक्षेत्रातील नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी शेळके, पोतदार आणि केरुर या ‘ त्रिकुटा ‘ ने एका शेतकऱ्याच्या विहिरीचा उपसा ट्रॉलीत भरुन नेत असलेले ट्रॅक्टर्स अडवून, त्या चालकांना मुरुम चोरीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत, प्रारंभी १० हजार रुपयांची मागणी केली होती. शेवटी तडजोडीत ६ हजार रुपये घेऊन ते निघून गेले होते.
या संदर्भात ट्रॅक्टर मालक जहाँगीर शेख यांच्याशी झालेला भ्रमणध्वनीवरील संवादाची ऑडिओ क्लिप त्याच दिवशी सामाजिक माध्यमांवर काही मिनिटात प्रसारीत झाली होती. मात्र ‘ त्या ‘ पोलिसांच्या धमकीला घाबरुन ट्रॅक्टर मालकांनी विहिरीचा उपसा वाहतुकीच्या कामाला ‘ ब्रेक ‘ लावला. यावरून ट्रॅक्टर मालकांच्या मनात त्या ‘ त्रिकुटा ‘ ची दहशत किती आहे, हेही पुढे आले आहे.
दरम्यान या ‘ त्रिकुटा ‘ तील पोतदार – शेळके यांनी गेल्या काही महिन्यात कासेगांव पोलिस दूरक्षेत्रातील कासेगांव, होनसळ गांवात गौण खनिज उत्खनन कलमांच्या आधारे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन काही ट्रॅक्टर मालकांची आर्थिक पिळवणूक केल्याची रसभरीत चर्चा या परिसरात सुरु आहे.
शेतकरी आपल्या जमिनीत सुधारणा करण्याचे प्रयत्न करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून शेतात काळी माती टाकणे अथवा करली रानाचा पोत सुधारण्यासाठी विहिरीच्या उपशाचा गाळ आणि माती टाकणे, अशी कामे अग्रकमाने केली जातात. अशाच कामाचे ट्रॅक्टर्स अडवून खाकीतील त्रिकुटाने ६ हजार रुपयांचा ‘ मलिदा ‘ खाल्ला, त्यासंबंधी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी शुक्रवारपासून चौकशीचं सत्र सुरु केलं आहे.