महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे दिनांक २५ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्हा मुख्यालय व सर्व तालुक्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. ही लोक अदालत यशरवी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांची वेळो-वेळी आढावा बैठक घेऊन सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार लोक अदालतीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील पाणीपट्टी, घरपट्टी थकीत असलेली जास्तीत जास्त प्रकरणे दाखल झालेली होती. यावावत वारंवार पाठपुरावा करुन गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना लोक अदालतीबावत वेळापत्रक ठरवून दिलेले होते. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये मोठया प्रमाणात लोक अदालतीमध्ये दावे ठेवण्यात आलेली होती.
सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण १०२३ ग्रामपंचायती असून त्यापैकी ५१६ ग्रामपंचायतीने लोक अदालतीमध्ये ७६५४ दावे दाखल केलेले होते. या दाव्यांची वसूलीची रक्कम २९ कोटी ७५ लाख ०८.८८५ इतकी होती. लोक अदालतीपुर्वी रक्कम ५८ लाख ०७,५७१ इतकी रक्कम वसुल झालेली आहे. दिनांक २५ सप्टेंबर २०२१ च्या लोक अदालतीमध्ये रक्कम ९० लाख ९०हजार ७५० इतकी रक्कम वसूल झाली. व तसेच तडजोड नाम्यामध्ये १३२९ खातेदारांनी रक्कम २ कोटी ०२ लाख ६६,२११ इतकी रक्कम भरणेची हमी दिलेली आहे. जिल्ह्यामध्ये झालेल्या लोक अदालतीस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून भविष्यकाळात परत एकदा लोक अदालतीचे नियोजन करण्याचे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत सुरु आहे.


















