सोलापूर : स्मार्ट सिटीचे चेअरमन असीम गुप्ता, आणि सीईओ त्र्यंबक ढेंगळे पाटील यांच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी जेष्ठ माजी नगरसेवक युएन-बेरिया यांनी केले आहे.
ते म्हणाले, शहरांमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या अनेक कामाबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. हे दोन्ही अधिकारी कुणाला जुमानत नाहीत. वेगवेगळी काम मंजूर होतात आणि रोखलीही जातात. उजनी ते सोलापूर दुसऱ्या लाईनचे काम असंच थांबवण्यात आलं आहे. हे का थांबलं ? हे जनतेला समजायला हवं आणि याला जबाबदार कोण हे ही समजायला हवं. यू एन बेरिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सोलापूर महानगरपालिकेच्या मिळकत करातील पाच टक्के वाढीला तीव्र विरोध दर्शवला.
वर्षाची पाणीपट्टी घेणाऱ्या महापालिकेने वर्षभरात शंभर दिवसही पाणी पुरवलं नाही. यामुळे पाणीपट्टीत 50 टक्के सूट द्यावी अशी ही मागणी बेरिया यांनी केली आहे. ते म्हणाले, दर चार वर्षांनी महापालिका अंतर्गत मिळकतीचे रिविजन झालं पाहिजे. गेली 25 वर्ष हे रिविजन झालं नव्हतं. यामुळे महानगरपालिकेचा महसूल बुडाला आहे. अनेक घरांच्या नोंदी नाहीत. अनेक मिळकतदारांनी बिगर घरगुती व्यवसायासाठी आपल्या जागा दिल्या आहेत याच्या नोंदी पालिकेकडे नाहीत.
या नोंदी झाल्या तर पाच टक्के कर वाढीची गरज भासणार नाही. सध्याचे महानगरपालिकेचे कराचे दर इतर महापालिकेच्या तुलनेत अधिक आहेत आणि ही नवी वाढ सोसणारी नाही. आपण या सर्व मागण्यांसाठी येत्या 9 जानेवारी रोजी डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करणार आहोत. यात शहरातील नागरिक काळ्याफिती लावून सहभागी होतील असेही बेरिया यांनी सांगितलं.

















