सोलापूर : जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे एकाकी लढले. त्यांच्या सून वैशाली साठे या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत उमेदवार होत्या. मात्र त्यांचा केवळ सोळा मतांनी निसटता पराभव झाला. या पराभवाने काका साठे काहीसे नाराज झाले असले तरी त्यांनी दिग्गज नेत्यांना चांगलेच पळवले. या पराभवानंतर सोमवारी ते जिल्हा परिषदेमध्ये आले असता पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया घेतली. यावे सावधपणे बोलताना, आम्हाला वेळ कमी मिळाला आणि या दिग्गज नेत्यांसमोर आपण कमी पडलो मात्र आता जास्त बोलणार नाही वेळ आल्यावर नक्कीच बोलेन या शब्दात त्यांनी इशारा दिला.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अशीच समविचारी आघाडी एकत्र येऊन निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता, ते एवढं सोपं आहे का? मी सोलापूरचा जिल्हाध्यक्ष आहे या निवडणुका माझ्याच नेतृत्वाखाली होणार असे म्हणून त्यांनी या नेत्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

















