राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली, या बैठकीला कामगार नेते आडम मास्तर, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकित घोषणा झाल्यावर लगेच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगत बैठकीचे फोटो व बातमी व्हायरल केली, त्या पाठोपाठ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार आडम मास्तर यांच्याकडून ही या निर्णयाचे स्वागत झाले त्यांनी मागील 25 वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्यामुळे हे झाल्याचं सांगत मास्तरांकडून ही प्रसिद्धी झाली. बरे झाले भाजपचे आमदार सुभाष देशमुखांनी यामध्ये श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही.
मागील अनेक वर्षांपासून राज्यात यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी आहे, सोलापूरात आडम मास्तर हे कष्टकरी, विडी, यंत्रमाग, बांधकाम, असंघटित कामगारांचे नेतृत्व करतात, कामगारांच्या मागण्यासाठी ते शासन दरबारी भांडत असतात, हजारों आंदोलन, मोर्चे उपोषण त्यांनी केले, आमदार असताना विधानसभेत ते कायम आवाज उठवायचे. मात्र 2009 नंतर जवळपास बारा वर्षे ज्या भागाचे नेतृत्व आडम मास्तर करत होते त्यांचे नेतृत्व काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या करत आहेत, त्यामुळे विधानसभेत त्या कामगार प्रश्नी आवाज उठवतात, आडम यांच्या 25 वर्षाच्या पाठपुरावा, प्रयत्नाबरोबर हे यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापण्यात आमदार प्रणिती शिंदे यांचे ही श्रेय नाकारता येत नाही.राजकारण श्रेयवाद रंगणार हे निश्चित आहे. यापूर्वी आमदार प्रणिती ताईंकडून अनेक वेळा “मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है” ची भाषा येत होती मात्र याविषयात हा शब्द कुठेच दिसत नाही.
सध्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी 2020 मधील अधिवेशनाचा व्हिडीओ व्हायरल केला आहे…
तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आडम मास्तरांचे रेल्वे स्टेशनवर जंगी स्वागत केले मास्तरांनी तर आपल्या व कामगारांच्या 25 वर्षाच्या लढ्याला यश आल्याचा दावा केलाय…

















