सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने व्हीप बजावूनही माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल देवी मोहिते-पाटील, स्वरुपाराणी मोहिते पाटील, अरुण तोडकर, गणेश पाटील, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले या सहा सदस्यांनी विरोधात मतदान केले होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला या सदस्यांनी पक्षाचा व्हीप डावल्याबद्दल त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू आहे.
मंगळवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर सुनावणी होती, शितलदेवी मोहिते-पाटील यांचा जिल्हा परिषद गट नगरपालिकेमध्ये वर्ग झाल्याने त्यांचे नाव या प्रकरणातून वगळावे अशी मागणी करण्यात आली होती मात्र त्याला तक्रारदार काका साठे यांनी हरकत घेतली, त्यावर जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून कोणताही निकाल दिला गेला नाही.
दरम्यान हायकोर्टाच्या आदेशानुसार प्राथमिक मुद्दा काढावा, याचिका दाखल करताना जे कागदपत्रे सादर केले नाहीत,पुरावे नाहीत त्यावर पूर्ण चौकशी न करता प्राथमिक मुद्द्यावरच पिटीशन डिसमिस करावा अशा मागणीचा मोहिते पाटील गटाचा अर्ज नामंजूर करण्यात आला आणि मोहिते पाटील गटाला तोंडी पुरावा सादर करण्यासाठी तारीख दिली होती.
या निकाला विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्याची सुनावणी 30 सप्टेंबर रोजी आहे, मंगळवारी ऍड दत्तात्रय घोडके यांनी त्या पिटीशनची नोटीस काका साठे यांना जिल्हाधिकाऱ्यांसमोर दिली. तसेच या प्रकरणात जे कागदपत्रे नव्याने जोडत जात आहेत ते फाईलला पेजिंग करावे अशी मागणी ऍड घोडके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. दरम्यान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 21 सप्टेंबर ही पुढील तारीख दिली आहे.



















