सोलापूर : वन्यजीवांच्या अधिवासास अधिक संरक्षण उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यात नान्नज माळढोक अभयारण्याचाही धोकाग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये समावेश असून त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, त्यांच्या अडी-अडचणी समजून घेता याव्यात या उद्देशाने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती सहायक वनसंरक्षक दिलीप वाकचौरे (पुणे) यांनी दिलीय.
वन्यजीवांना अधिवास होण्यासाठी राज्यातील उपलब्ध अभयारण्ये धोकाग्रस्त अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात येत असून त्यामध्ये नान्नज माळढोक पक्षी अभयारण्याचा समावेश करण्यात आला आहे. यापुढे माळढोक पक्षी अभयारण्य धोकाग्रस्त अतिसंवेदनशील वन्यजीव अधिवास म्हणून ओळखले जाणार आहे.
माळढोक अभयारण्य क्षेत्रातील विद्यमान हक्कात बदल किंवा पुनर्वसन तसेच अभयारण्य क्षेत्रात लोकांना यापूर्वी देण्यात आलेले वैयक्तिक व सामूहिक हक्कांबाबत क्षेत्र घोषित करण्यापूर्वी दाव्यांसंबंधी निर्णय घेण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी ग्रामपंचायत शनिवारी, ०९ जुलै रोजी सकाळी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
माळढोक अभयारण्यात शेतजमीन किंवा घर असेल व ते कायम ठेवण्यासाठी वैयक्तिक किंवा सामूहिक दावा शासन, जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांकडे पेंडिंग असेल तर तो मार्गी लावण्यात येणार आहे; मात्र हे क्षेत्र घोषित झाल्यानंतर दावा दाखल करता येणार नाही, मात्र तसे प्रकार नान्नज, गंगेवाडी अभयारण्यात नाहीत, असे सहायक वनसंरक्षक दिलीप वाकचौरे यांनी म्हटलंय.
माळढोक पक्षी अभयारण्य धोकाग्रस्त (अतिसंवेदनशील) वन्यजीव अधिवास क्षेत्र निर्मितीच्या प्रक्रियेत जंगल, जमीन सुरक्षित राहणार आहे. त्यात लगतच्या शेतजमिनी ताब्यात घेणे अथवा वनक्षेत्रासाठी अधिग्रहण करणे असा प्रकार नसल्याचेही त्यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करताना सांगितलं.
यावेळी नान्नज, गंगेवाडी माळढोक अभयारण्य वनक्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
राज्यात ४९ अभयारण्ये व ६ राष्ट्रीय उद्याने अशी ५५ संरक्षित क्षेत्रे आहेत. ही सर्व संरक्षित क्षेत्रे धोकाग्रस्त अतिसंवेदनशील वन्यजीव अधिवास क्षेत्र निर्मिती करण्याचा प्रस्तावित आहे. शासनाच्या या निर्णयात नान्नज माळढोक अभयारण्याचाही समावेश असल्याने हा परिसर धोकाग्रस्त अतिसंवेदनशील वन्यजीव अधिवास क्षेत्र म्हणून राज्याच्या नकाशावर राहणार आहे, हे मात्र निश्चित !
……………


















