सोलापूर : एमआयएम प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथे मोठे राजकीय विधान केले आहे. एमआयएम सध्या महाराष्ट्रातील पाच टक्के मुस्लिम आरक्षणासाठी आवाज उठवत आहे त्यासाठी मुंबईला राज्यस्तरावर एम आय एमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी भव्य असा मोर्चा काढला, या मोर्चाद्वारे सरकारला त्यांनी मुस्लिम आरक्षणाचे अल्टिमेट दिला आहे. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आरक्षणाचा निर्णय घ्यावा अन्यथा पुन्हा मोर्चे काढू असा इशारा त्यांनी दिलाय.
दरम्यान औरंगाबाद मध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये खासदार जलील यांनी जर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतला तर आगामी महापालिकेची राज्यातील कोणतीही निवडणूक एमआयएम पक्ष लढवणार नाही असे सांगून मोठे विधान केले.
महापालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एमआयएम पक्ष कायमच डोकेदुखी ठरला आहे. मुस्लिम समाजाची बहुतांश मते हा पक्ष घेत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मताधिक्यमध्ये घट होते आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टी पक्षाला मिळतो. त्यामुळे खासदार जलील यांच्या वक्तव्याचा विचार करता महाविकास आघाडी सरकार मुस्लिम आरक्षणाच्या विषयी कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
















