सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी शनिवारी सोलापूरला धावती भेट दिली. लातूर जिल्ह्यातील उदगीर इथल्या साहित्य संमेलनात सहभाग नोंदवून ते सोलापूरला आले, शासकीय विश्रामगृहावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, तहसीलदार जयवंत पाटील, तहसीलदार अमोल वारके यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचे स्वागत जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते सोलापुरी टॉवेल भेट वस्तू देऊन करण्यात आले. ही आगळीवेगळी भेट वस्तू पाहून ‘व्हेरी नाईस’ असे शब्द देशपांडे यांच्या तोंडून आले. दरम्यान, सोलापुरात तृतीपंथीयांना मतदान ओळखपत्र दिल्याचे त्यांनी कौतुक केले तसेच लवकरच राज्यातील सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची एक कार्यशाळा घेऊन मतदान नोंदणी प्रक्रिया मध्ये येणाऱ्या अडचणी तसेच काही सूचना जाणून घेणार असल्याचे देशपांडे यांनी यावेळी सांगितले. शासकीय विश्रामगृहावर चहापानानंतर ते लगेच मुंबईकडे रवाना झाले.



















